वसई:-मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन जणांना अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या पाच मोटरसायकली जप्त केले आहेत.
वसई विरार व मिरा भाईंदर शहरात सातत्याने वाहने चोरी होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. नुकताच नायगाव पूर्वेच्या बापाणे येथील एलएनटी कंपनी जवळून आकाश लहाने यांची उभी असलेली स्कुटी चोरीला गेली होती. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊननायगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दोन पथके नियुक्त केली होती.
तांत्रिक तपास व गुप्त बातमी तारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मिरा रोड परिसरात सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले.
यात मोसीन चुंन्ने खान (२१), शाहरुख खान (२०), हसनेन खान (१९) या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय मिरा रोड, उत्तन व दहिसर भागात ही ४ गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासातून समोर आले.
तिन्ही आरोपींकडून २ लाख ८५ किंमतीच्या विविध कंपन्यांच्या ५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.ही कारवाई ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे व पोलीस निरीक्षक विजय कदम यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार शेखर पवार, सचिन ओलेकर, पोलीस अंमलदार चेतन ठाकरे, सचिन खंताळ, अमर पवार, जयवंत खंडवी,अशोक पाटील आणि पांडुरंग महाले यांच्या पथकाने केली आहे.

