वसई: नायगाव रेल्वे स्थानकातील फलाटावरील एका बाकावर झोपलेल्या माणसाच्या खिशातील मोबाईल फोन चोरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवसाढवळ्या हा चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नायगाव रेल्वे स्थानक हे इतर रेल्वे स्थानकांच्या तुलनेने कमी गर्दीचे आणि वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकात प्रवाशांची फारशी ये-जा नसते. याच गोष्टीचा फायदा आता भुरटे चोर घेताना दिसत आहेत.
नायगाव रेल्वे स्थानकातील चोरीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण रेल्वे स्थानकातील एका बाकावर गाढ झोपलेला दिसून येत आहे. तो गाढ झोपला असल्याचे पाहून त्याच्या बाजूला एक अनोळखी इसम घुटमळताना व्हिडिओत दिसत आहे.
त्यानंतर तो इसम झोपलेल्या तरुणाची झडती घेत असल्याचे त्याच्या चारही बाजूंनी फिरताना दिसत आहे. काहीवेळाने झोपलेल्या तरुणाने कुस बदलल्यावर चोर त्याच्या खिशातील मोबाईल काढून घेऊन आपल्या खिशात टाकताना आणि काहीच न घडल्याचा आव आणत तिथून पळ काढताना व्हिडिओत दिसत आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी नायगाव स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काहींनी झोपलेल्या तरुणालाच बेजबाबदार ठरवले आहे.
