वसई: नायगाव पूर्वेच्या जूचंद्र परिसरात मुलांना खेळण्यासाठी मैदान उभारण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्या जागेत क्रीडा संकुलाची उभारणी व्हावी यासाठी सुद्धा महापालिकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या जागेची पाहणी करून त्यानुसार आरखडा तयार करण्यात यावा अशा सूचना महापालिका आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून नायगाव पूर्वेतील भागात एकही खेळाचे मैदान उभे राहू शकले नसल्याने खेळण्यासाठी तरुणांना अडचणी निर्माण होत होत्या. तसेच नाईलाजास्तव शेतात, खारटन, गल्लीबोळात व इतर मोकळ्या जागेत खेळण्यासाठी जावे लागत आहे. मात्र झपाट्याने हा परिसर विकसित होत असल्याने मोकळ्या राहिलेल्या जागा ही कमी झाल्या आहेत. अशा  परिस्थितीमुळे मैदानाविना परिसरातील तरूणाईच्या खेळाडू वृत्तीस खीळ बसत आहे. या भागात एक तरी खेळाचे मैदान व्हावे अशी मागणी सातत्याने करीत करीत असतात.

खेळाच्या मैदानाविना खेळाडुंची होणारी गैरसोय लक्षात घेता नगरसेवक कन्हैया भोईर यांनी नायगाव पूर्वेच्या जूचंद्र भागात मैदानासाठी जागा आरक्षित आहे. त्याठिकाण सुसज्ज खेळाचे मैदान तयार करण्याच्या कामाला गती मिळावी अशी मागणी महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.  मैदानासाठी जवळपास ८ एकर जागा उपलब्ध असल्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. यावेळी आयुक्तांनी सुद्धा याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत क्रीडा संकुल तयार व्हावे यासाठी जागेची पाहणी करून आरखडा तयार करण्यात यावा अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रदीप पाचंगे यांना दिल्या आहेत.

याशिवाय या क्रीडा संकुलासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनची सुद्धा मदत घेतली जाईल. जेणेकरून क्रीडा संकुल तयार झाल्यास १४ वर्षाखालील व अन्य सर्वच मुलांना त्याचा फायदा होईल असे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.