वसई :- वसई विरार शहरात विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येत आहेत. गुरुवारी नायगाव पूर्व येथील बालाजी हॉटेलसमोरील रस्त्यालगत असलेल्या एका रोहित्राच्या (ट्रान्सफार्मर) केबलचा तीव्र झटका लागल्याने एका २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
झाल्याची घटना घडली.ज्ञानसागर महाजन मिश्रा असे मृत तरुणाचे नाव आहे. मागील तीन महिन्यातील विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याची ही आठवी घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत ज्ञानसागर मिश्रा हा एका इलेक्ट्रिक सुपरवायझरकडे हेल्पर म्हणून काम करत होता. गुरुवारी दुपारच्या ज्ञानसागर हा नायगाव पूर्व येथील बालाजी हॉटेलसमोरील रस्त्यावरून जात असताना, तेथील रोहित्राच्या केबलचा त्याला अचानक जोरदार झटका लागला. हा विद्युत धक्का इतका भीषण होता की त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सातत्याने शहरात विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. मागील तीन महिन्यात विविध विजेचा धक्का लागून आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
यापूर्वीच्या दुर्घटना
एप्रिल २०२६ नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबाचा अचानक स्पर्श झाल्याने लिलाबाई अमरनाथ मिश्रा (७९) या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला.
१५ मे २०२६ नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार परिसरातील एका फॅब्रिकेशन कंपनीत काम करत असताना देवा समेस गौतम (२०) या तरुण कामगाराला स्टील वेल्डिंग करताना विजेचा जोरदार धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झाला.
१५ मे २०२६ नायगाव पूर्वेच्या ससूनवघर परिसरातील गिरणार हॉटेलसमोर लोखंडी बॅनर हटवण्याचे काम सुरू असताना, अभय राकेश तिवारी (२०) या तरुणाचा बॅनरच्या वरून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या (हायव्होल्टेज) विद्युत वाहिनीशी स्पर्श झाला. तीव्र झटक्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
१२ जून २०२६ विरार पूर्वेच्या फुलपाडा परिसरात वीज खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना महावितरणचा कंत्राटी कामगार गौरव सुरेश गोरे (१८) या अल्पवयीन तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
१६ जून २०२६ नालासोपारा पांचाळ नगर भागात राहणारा १९ वर्षीय तरुण रामभजन पुत्तिलाल निशाद हा इलेक्ट्रीक कटरने लोखंडी गज कापत असताना विद्युत वाहिनीच्या संपर्कात आला आणि विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला.
१७ जून २०२६ वसई पूर्वेच्या वालीव येथील खैरपाडा परिसरात फजरुल रहमाण मंडल (५२) हे रात्रीचे जेवण बनवत असताना खोलीतील कुलरला त्यांचा स्पर्श झाला. कुलरमध्ये वीज उतरल्याने (करंट आल्याने) त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
२४ जून २०२६ नायगाव पूर्वेच्या स्टार सिटी परिसरात घरावर ताडपत्री टाकण्यासाठी चढलेल्या रोशन मालवी (२०) या तरुणाला जवळच असलेल्या विजेच्या खांबाचा धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झाला.
