वसई: तलावात मासे पकडण्यासाठी गेलेला १७ वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना रविवारी दुपारी नालासोपारा पूर्वेतील गाला नगर-नारायण नगर परिसरातील नागेला तलावात’ घडली. सोहेल इब्राहिम असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून, अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या, तलाव आणि जलाशय तुडुंब भरले आहेत. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी अशा धोकादायक ठिकाणी पोहण्यास व फिरण्यास बंदी घातली आहे. मात्र, प्रशासनाचे नियम बाजूला ठेवून रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सोहेल आपल्या मित्रांसोबत नागेला तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता. मासे पकडत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, सोहेलचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर याप्रकरणी आचोळे पोलिसांकडून ही तपास सुरू आहे.
तलाव सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
या घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिक, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.तलाव परिसरात कोणतीही संरक्षण भिंत किंवा सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. तसेच सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करूनही महापालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
