वसई: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत नालासोपारा रेल्वे सुरक्षा बलाला (RPF) मोठे यश आले आहे. स्थानक परिसरात एकाच दिवसात झालेल्या मोबाईल चोरीच्या तीन घटनांचा छडा लावत आरपीएफने एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. मोशिम मोजिद मोल्ला (२४) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

रेल्वेतील वाढत्या गर्दीचा गैरफायदा भुरटे चोर घेऊ लागले आहेत. या गर्दीत प्रवाशांचे मोबाईल चोरी होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ०२ आणि ०४ वरून तीन प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले होते. चोरीला गेलेल्या या मोबाईलची एकूण किंमत ५२ हजार रुपये इतकी होती. याप्रकरणी वसई लोहमार्ग पोलिसांनी (GRP) भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.

या चोरीच्या घटनांना गांभीर्याने घेत नालासोपारा आरपीएफच्या पथकाला तपासासाठी तैनात करण्यात आले. पथकाने रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासून फुटेजच्या आधारे एका संशयित व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आणि त्याच दिवशी त्याला स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्याची कसून चौकशी केली असता मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.

मोशिम मोजिद मोल्ला (२४) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाने दिली आहे. ही कारवाई आरपीएफ निरीक्षक लोकेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय भानु प्रताप सिंह (तपास अधिकारी)कॉन्स्टेबल विनोद कुमार, कॉन्स्टेबल कृष्ण कुमार एमएसएफ जवान पारस आणि कपिल आदींच्या पथकाने केली आहे.