वसई :- वसई विरार महापालिका निवडणुकीत उत्तरभारतीय मतदारांचा प्रभाव असणाऱ्या नालासोपारा मतदारसंघातून भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकींप्रमाणे यावेळीही नालासोपारा मतदारसंघ भाजपसाठी तारणहार ठरला असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.

वाढते अनधिकृत बांधकाम आणि उत्तरप्रदेश, उत्तराखंड व बिहार या राज्यातून झालेले स्थलांतर यामुळे नालासोपारा शहर हे अवघ्या काही वर्षातच उत्तरभारतीय नागरिकांचे माहेरघर बनले आहे. शहरातील पायाभूत सुविधा, आर्थिक, पर्यावरणीय, आणि संस्थात्मक विकास तसेच महत्त्वाच्या घटनांवर उत्तरभारतीय नागरिकांचा प्रभाव दिसत असताना. वसई विरारमधील राजकारणातही नालासोपारा मतदार संघ निर्णायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.

गेली ३५ वर्षे वसई, बोईसर आणि नालासोपारा मतदार संघांवर हितेंद्र ठाकूरांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, २०२४ मध्ये नालासोपारा मतदारसंघातून मिळालेल्या उत्तरभारतीय मतांच्या जोरावर भाजपने हे वर्चस्व मोडीत काढण्यात यश मिळवले. नालासोपारा मतदार संघातून २००९ ते २०१९ या दरम्यान हितेंद्र ठाकूरांचे पुत्र क्षितीज ठाकूर हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. पण, २०२४ साली राजकीय परिस्थिती बदलली आणि भाजपच्या राजन नाईक यांनी ठाकूर यांचा ३७ हजार मतांनी पराभव करून नालासोपारा मतदारसंघावर वर्चस्व मिळविले. तर पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ.हेमंत सावरा यांनीही नालासोपाऱ्यातूनच ७१ हजार मतांची आघाडी घेऊन खासदारकी मिळवली होती.

सव्वा अकरा लाख मतदारांपैकी अवघे सहा लाख ते साडे सहा लाख मतदार आणि २९ प्रभागांपैकी एकूण १७ प्रभाग हे एकट्या नालासोपारा मतदारसंघात आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे महापालिका निवडणुकीतही नालासोपारा मतदारसंघ भाजपसाठी गेमचेंजर ठरला आहे. भाजपने जिंकलेल्या एकूण ४३ जागांपैकी ४ जागा या वसई मतदारसंघातील ३ जागा बोईसर मतदारसंघातील असून ३६ इतक्या सर्वाधिक जागा या नालासोपारा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे उत्तरभारतीय मतदारांच्या जोरावर भाजपने ही मुसंडी मारली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न

नालासोपारा मतदार संघातील आपल्याकडे वळविण्यासाठी या महापालिका निवडणुकीतही प्रयत्न करण्यात आले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली नसली तरी त्यांच्या छायाचित्राचे फलक प्रचारात वापरण्यात आले. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा ही नालासोपाऱ्यात पार पडली होती. याशिवाय बिहार नवनिर्वाचित आमदार व लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर, सिनेकलाकार पवन कुमार यांना प्रचारासाठी मैदानात उतरविले होते.

वसईत मतदारांनी भाजपला नाकारले

वसई मतदारसंघात २९ पैकी एकूण ८ प्रभाग मोडतात. त्या ८ प्रभागांमध्ये तब्बल ३१ जागा आहेत. तर त्यापैकी २७ जागांवर बहुजन विकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. तर भाजपला फक्त चार जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे वसईच्या मतदारांनी भाजपला सपशेल नाकारले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

बविआच्या बालेकिल्ल्यात भाजपची सरशी

बहुजन विकास आघाडीला वसई, विरार आणि बोईसर पट्ट्यातून सर्वाधिक मतदान झाले आहे. पण, या भागातील काही मतदार संघांमध्ये मताधिक्य मिळवण्यात भाजपने यश मिळवले आहे. विरार पश्चिमेतील प्रभाग २ आणि ५ हे बहुजन विकास आघाडीचे पारंपारिक मतदारसंघ राहिले आहेत. पण, या प्रभागांमध्ये मातब्बर नेत्यांचा पराभव करत भाजपने विजय मिळवला आहे.