वसई: नालासोपारा पश्चिमेतील रिक्षा थांब्यांवर ओला, उबेर आणि रॅपिडो चालकांनी वाहने उभी करू नयेत, अशा सूचनेचा व विविध थांब्यांसाठी आकारल्या जाणाऱ्या दरांचे फलक रिक्षा चालक संघटनांकडून लावण्यात आले आहे. मात्र, रिक्षा चालकांच्या या मनमानी विरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
वसई विरार शहरातील अपुरी बससेवा, खाजगी वाहने उभी करण्यासाठी वाहनतळांचा अभाव अशा विविध कारणांमुळे बहुतांश नागरिक रिक्षाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात वसई विरार शहरात रिक्षाचालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पण, शहरातील रिक्षा चालकांची संख्या जरी मोठी असली तरी त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकणाऱ्या नियमांची अंमलबजावणी योग्यरीत्या न झाल्याने त्याचा मनस्ताप सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या अवाजवी भाडे आकारणीला चाप बसावा म्हणून १५ नोव्हेंबर २०२५ पासून मीटर रिक्षा सुरू करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी दिले होते. तसेच वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी रिक्षाला हिरवा झेंडा दाखवत मीटर रिक्षा सुरू झाल्याची अधिकृत घोषणाही केली होती. मात्र, यानंतरही शहरात मीटर रिक्षाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. यामुळे प्रवाशांना रिक्षाने प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत.

प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये भाडे आकारणीवरून सुरू असलेला वाद शिगेला पोहोचला असताना नालासोपारा पश्चिमेतील डी-मार्ट परिसरात लावण्यात आलेल्या फलकांमुळे या वादात अधिकच भर पडली आहे. ओला, उबेर आणि रॅपिडो या ॲप आधारित वाहनचालकांना रिक्षा थांब्याच्या शंभर मीटर परिसरातील प्रवाशांचे बुकिंग स्वीकारण्याची परवानगी नाही. तसे केल्यास कारवाई केली जाईल, अशा सूचनेचा फलक नालासोपाऱ्यात लावण्यात आला आहे. तर यात भर म्हणून विविध थांबांसाठी आकारल जाणाऱ्या ५० ते २५० रुपयांच्या अवाजवी दरांची पाटीही रिक्षा चालक संघटनांकडून लावण्यात आली आहे.
त्यामुळे रिक्षा चालकांनी काढलेल्या नव्या फतव्याविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच याबाबत वाहतूक पोलीस किंवा आरटीओ विभाग कारवाई करणार आहे का, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
