वसई: वसई-विरार परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. अशातच नालासोपारा पूर्वेकडील वालईपाडा येथील एका मोकळ्या मैदानात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय नमन केसरवाणी या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली.
नालासोपारा पूर्वेतील गरळपाडा, जयअंबे चाळीत राहणारा नमन केसरवाणी हा सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आपल्या पाच मित्रांसह वालईपाडा येथील मोकळ्या मैदानात गेला होता. मुसळधार पावसामुळे या मैदानाला जलाशयाचे स्वरूप आले होते. सर्व मुले पाण्यात पोहण्यासाठी उतरली असता, पोहत असताना नमनचा अचानक तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो न सापडल्याने त्यांनी तात्काळ बाहेर येऊन स्थानिकांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल आणि पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दोन तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास नमनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.या मैदानात पावसाचे पाणी साचले असले तरी तिथे आधीपासूनच एक खोल खड्डा होता. त्याच खड्ड्यात बुडाल्याने नमनचा मृत्यू झाला असावा. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी सांगितले आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
मुसळधार पावसामुळे सध्या नद्या, नाले आणि इतर जलसाठे अत्यंत धोकादायक बनले आहेत. पालकांनी आणि नागरिकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे. वसई-विरारमधील विविध पर्यटनस्थळांवर यापूर्वीच प्रवेशबंदी लागू करण्यात आली असून, नागरिकांनी स्वतःच्या व आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
