वसई:- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील अमली पदार्थ विरोधी कक्ष-२ ने एका धडक कारवाईत नालासोपारा पूर्व परिसरातून ४२ ग्रॅम ‘गर्दा’ (ब्राऊन शुगर) जप्त केला आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे ८ लाख ४० हजार रुपये इतकी आहे.
वसई विरार, मिरा भाईंदर शहरात अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अमली पदार्थांच्या तस्करांना रोखण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाईची मोहीम सुरु केली आहे. नुकताच अमली पदार्थ विरोधी कक्ष-२ चे पथक आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. नालासोपारा पूर्व येथील चंदन नाका, आचोळे रोड परिसरात दोन संशयित व्यक्ती दुचाकीवरून जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४२ ग्रॅम वजनाचा गर्दा (ब्राऊन शुगर) नावाचा अमली पदार्थ आढळून आला आहे.त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात ८ लाख ४० हजार इतकी किंमत आहे. इस्माईल अथर अली खान (२४) फैजान सईद जुलजुले (२३) अशी अटक आरोपींची नाव आहेत. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई अमली पदार्थ विरोधी कक्ष-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ, सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
