वसई:- वसई विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा अमली पदार्थ तस्करीच्या घटना उघड होत आहेत. अमली पदार्थ विरोधी कक्ष-२ ने एका धडक कारवाईत नालासोपारा संतोषभवन परिसरात ३० ग्रॅम ‘गर्दा’ (ब्राऊन शुगर) जप्त केला आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे ६ लाख ९५ हजार रुपये इतकी आहे.

वसई विरार शहरात सातत्याने अमली पदार्थ तस्करीचे प्रकार समोर येत आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी आता अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. नुकताच अमली पदार्थ विरोधी कक्ष-२ चे पथक तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. संतोष भवन परिसरात दोन इसम संशयास्पदरीत्या दुचाकीवरून फिरताना पोलिसांना आढळले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची झडती घेतली असता ब्राऊन शुगर नावाचा अमली पदार्थ आढळून आल्याने दोघांना अटक केली आहे.

अब्दुल कदर अब्दुल आहद शेख (४७)शरीफ इजहाउलहक अब्दुल अन्सारी (४४) अशी अटक आरोपींची नाव असून त्यांच्याकडून ब्राऊन शुगर नावाचा अमली पदार्थ व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल असा एकूण ६ लाख ९५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी कक्ष-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ, सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, राजू भोईर, उमेश गवई, आसीफ मुल्ला, अमित चव्हाण, सुनील पागी, सुधीर नरळे, स्वप्नील मोहीले, राजकुमार गायकवाड, अंगद मुळे, अजित मैड, किरण रसाळ आणि प्रितेश खैरनार यांच्या पथकाने केली आहे