वसई: प्रवाशांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने नालासोपारा बस आगारात सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले होते. मात्र, प्रवाशांनी वाचण्यासाठी नेलेली पुस्तके परत आणून न दिल्यामुळे आगारातील स्टँडवरील उरलेली पुस्तके बाजूला काढून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उद्घाटनाच्या अवघ्या पंधरा दिवसांतच सार्वजनिक वाचनालयाचा प्रकल्प गुंडाळला गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
लांब पल्ल्याचा प्रवास करताना अनेकांना पुस्तक वाचण्याची सवय असते. मात्र, अलीकडच्या धकाधकीच्या काळात वाचनालय जाऊन पुस्तक घेणे, ते वेळेवर करत करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाचन संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीने नालासोपारा बस आगारात सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्य दिनी आमदार राजन नाईक यांच्या हस्ते या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.
यावेळी विविध विषयांवर आधारित तसेच प्रसिद्ध लेखकांची सुमारे ३० पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. उद्घाटनानंतर काही प्रवाशांनी आगारातील वाचनालयातील पुस्तकेही वाचण्यासाठी नेली होती. मात्र, यापैकी अनेकांनी पुस्तक परत न केल्याने एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम अवघ्या १५ दिवसातच गुंडाळला गेला आहे.
आगारातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला या वाचनालयात एकूण तीस पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. यापैकी अनेक पुस्तके वाचकांनी वाचण्यासाठी घरी नेली. पण, यापैकी अनेकांनी पुस्तके परत केली नसून आता वीसच पुस्तके उरली आहेत. त्यामुळे बाकीची पुस्तके स्टँडवरून काढावी लागली.
सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम सुरू राहावा म्हणून पुस्तक नेणाऱ्या प्रवाशांची नोंद ठेवण्यासाठी तसेच या वाचनालयाची देखरेख करण्यासाठी व्यक्ती नियुक्त करून ते पुन्हा सुरू केले जाईल, अशी प्रतिक्रिया आगारप्रमुख नवनीत गावित यांनी दिली.
