वसई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात नालासोपारा बसस्थानकाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वर्ष २०२५-२६ या वर्षात घेण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत मुंबई प्रदेश स्तरावर नालासोपारा बसस्थानकाला ‘क’ गटात तृतीय क्रमांक मिळाला आहे.

राज्य परिवहन महामंडळात प्रवाशांना स्वच्छ,सुंदर बसस्थानके उपलब्ध व्हावीत व प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्याच्या हेतूने २३ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत महामंडळातील सर्व बसस्थानकांवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत सर्व बसस्थानकांची पाहणी करण्यात आली असून विजयी बसस्थानकांचा १ जून रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयात विशेष पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला. यावेळी नालासोपाऱ्याचे आगार प्रमुख नवनीत गावित तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. पालघर विभागातून या अभियानात दोनच बसस्थानकांनी बाजी मारली आहे. यामध्ये बोईसर बसस्थानकाने अ गटात द्वितीय क्रमांक, तर नालासोपारा बसस्थानकाने क गटात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

नालासोपारा बसस्थानक हे नेहमीच प्रवाशांच्या अलोट गर्दीसाठी आणि वर्दळीसाठी ओळखले जाते. अशा गजबजलेल्या स्थानकात स्वच्छता राखणे आणि ते सुंदर ठेवणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र, एसटी प्रशासकीय कर्मचारी, स्वच्छता दूत आणि स्थानिक प्रवाशांच्या सहभागामुळे नालासोपारा बसस्थानकाने मुंबई प्रदेशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याची प्रतिक्रिया नालासोपारा बस आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली.

वर्धापन दिनही उत्साहात साजरा
एस टी महामंडळाचा ७८वा वर्धापन दिन देखील वसईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बस आगारांच्या बाहेर सुबक रांगोळी काढून तसेच प्रवाशांना पेढे वाटून हा दिवस साजरा करण्यात आला.