वसई:विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया (एसआयआर) प्रक्रिया बनावट असून, ती भाजपच्या फायद्यासाठी राबवली जात असल्याचा आरोप करत सोमवारी काँग्रेसने नालासोपाऱ्यातील प्रांत कार्यालयासमोर आंदोलन पुकारले. यावेळी एसआयआर प्रक्रिया रद्द करून मतदारांचे मतदानाचे अधिकार पूर्ववत करावेत व निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया आणि मतांच्या चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याविरोधात २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभरात काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यातील प्रांत कार्यालयासमोर सोमवारी वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटीने देखील जोरदार घोषणाबाजी करत एसआयआर प्रक्रियेविरोधात आंदोलन पुकारले.

मतदानाचा हक्क हाच भारतीयत्वाचा सर्वात मूलभूत अधिकार आणि पुरावा असून, त्यापासून करोडो लोकांना वंचित ठेवणे हे देशद्रोहा समान आहे. अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी देशाशी गद्दारी केली असून, भारताच्या लोकशाही ढाच्याला सुरुंग लावण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश कुमार करत आहेत, असा घणाघाती आरोप जिल्हाध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी यांनी केला

तसेच ज्ञानेश कुमार इतकेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहसुद्धा या कृत्यासाठी जबाबदार असून, त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांचा मुखवटा लावलेल्या पुतळ्याला चपलांनी मारून भर रस्त्यात दहन करण्यात आले.

या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे, प्रदेश सरचिटणीस डॉमिनिक डिमेलो, प्रदेश सचिव रुपेश रॉड्रिक्स, जिल्हा सरचिटणीस किरण शिंदे, कार्याध्यक्ष रतन तिवारी, संदीप कनोजिया, कुलदीप वर्तक, अश्रफ अली, अर्शद डबरे, रफिक शेख, साजिद सय्यद, प्रिन्सली घोंसालवीस, रेनॉल्ड लोपीस, संजय मीना, भीमराव पेटकर, वेल्फ्रेड डिसोझा या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.