वसई: अयोध्या येथील श्रीराम मंदिर देणगीतील अपहार प्रकरणाविरोधात वसई विरार काँग्रेस कमिटीकडून गुरुवारी नालासोपारा येथे आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी सत्ताधाऱ्यांना घेरत प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दानपात्रांमधील देणग्यांच्या गैरव्यवहाराची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिर दानचोरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी या अपहार प्रकरणाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ओसवाल नगरी सर्कल, नालासोपारा पूर्व येथील श्री इच्छापूर्ती बालाजी हनुमान मंदिर येथे ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलन पुकारण्यात आले होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी राम नामाचा जप करत आणि हनुमान चालीसाचे पठण करून या आर्थिक गैरव्यवहाराचा तीव्र विरोध केला. तसेच सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या मागणीसंबंधीचे निवेदन जिल्हाध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी, वरिष्ठ नेते ओनिल अल्मेडा, प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांना देण्यात आले.

राम आमच्या मनात आहेत, राम आमच्या संविधानात आहेत.प्रभू श्रीराम हे मर्यादा, न्याय, सत्य आणि घटनात्मक मूल्यांचे प्रतीक आहेत. म्हणूनच प्रभू श्रीरामांच्या नावावर देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेसमोर संपूर्ण हिशोब असलाच पाहिजे. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाच्या प्रेरणेने हा सत्याचा आग्रह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि देशभर पोहोचवण्याचा आमचा निर्धार कायम राहील, अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडली.