वसई: नालासोपारा पश्चिमेतील धनंजय एव्हेन्यू या इमारतीमधील उद्वाहक यंत्र (लिफ्ट) शनिवारी दुपारी १२:३० च्या सुमारास अचानक ५ व्या मजल्यावरून कोसळल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ८ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नालासोपारा पश्चिमेतील पाटणकर पार्क परिसरात धनंजय एव्हेन्यू ही ७ मजली इमारत आहे. या इमारतीत ४० सदनिका व ९ दुकाने आहेत. शनिवारी दुपारी अचानक उद्वाहक यंत्र ५ व्या मजल्यावरून थेट खाली कोसळली.

या घटनेत सतीश भोंडवे या स्थानिक रहिवाशासह इमारतीतील सदनिका पाहण्यासाठी आलेल्या ३ महिला आणि ४ पुरुष असे एकूण ८ जण गंभीर जखमी झाले. अपघात होताच ५ व्या मजल्यावरून मोठा आवाज झाल्याने स्थानिक रहिवाशांनी धाव घेतली. तळघरात जाऊन अडकलेल्या जखमींना नागरिकांनी बाहेर काढले आणि तातडीने स्टार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

ही इमारत तीन वर्ष जुनी असून विकासकाने अडीच वर्षांपूर्वीच ती सोसायटीकडे हस्तांतरित केली आहे. परंतु, इमारतीतील लिफ्ट सुरुवातीपासूनच असुरक्षित असल्याची तक्रार विकासकाकडे करण्यात आली होती. मात्र, विकासकाने दुरुस्ती न केल्याने शेवटी रहिवाशांनी स्वतःच्या खर्चाने स्प्रिंग आणि बेल्ट बसवून घेतले होते. पण, तरीही आज ही दुर्दैवी घटना घडली, अशी प्रतिक्रिया सोसायटीचे अध्यक्ष समीर धोंडे यांनी दिली.