वसई : नालासोपाऱ्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. याच कारवाई दरम्यान पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ९ कोटी ७० लाख २६ हजार रुपये किंमतीचे मेफेड्रोन व कोकेन नावाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्यास आहेत. यातील अनेक नागरिक अमली पदार्थांच्या व्यवहारात सहभागी असल्याचे उघड होऊ लागले आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी नालासोपाऱ्यात पोलिसांनी बेकायदेशीर वास्तव्य व विना परवाना व्यवसाय करणाऱ्या नायजेरियन नागरिकांची धरपकड करून त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.

याच कारवाई दरम्यान नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथील प्रियांका अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या तीन नायजेरियन अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १० किलो ३२७ ग्रॅम कोकेन व मेफेड्रोन नावाचे अमली पदार्थ आढळून आले आहेत. त्यांची किंमत ९ कोटी २७ लाख २६ हजार इतकी आहे.

या प्रकरणी अमली पदार्थ जप्त करत तीन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बाबीये ग्रेस (३३), नाकाझिया इशा आणि जॅक्सन अशी आरोपींची नावं असून त्यांच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (क), २१ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दोनशेहून अधिकजण पोलिसांच्या ताब्यात

नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर, अगरवाल यासह इतर ठिकाणच्या भागात अधिक प्रमाणात नायजेरियन नागरिकांची वस्ती आहे. त्यांच्यामार्फत रात्रीच्या सुमारास हे अवैध प्रकार केले जाऊ लागले आहेत. त्यांच्या दादागिरीमुळे आजूबाजूला राहणाऱ्या व त्याठिकाणहून जाणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे बुधवारी पोलिसांकडून शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नालासोपारा परिसरात गुमास्ता  परवान्याशिवाय नायजेरियन नागरिक बेकायदेशीररित्या ४० दुकाने चालवत असल्याचे उघड झाले होते. तसेच यावेळी पोलिसांनी २०० हून अधिक नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले होते.

नायजेरियन नागरिकांच्या वस्त्यांमध्ये वाढ

पूर्वी मुंबई तसेच मिरारोड परिसरात मोठ्या संख्येने  नायजेरियन नागरिक वास्तव्यास होते. पण, पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर या नायजेरियन नागरिकांनी आता नालासोपारा शहराला आपले केंद्र बनवले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.