वसई:- नालासोपारा पूर्वेकडील ओम नगर परिसरातील ‘दुर्गेश्वरी अपार्टमेंट’च्या ‘सी’ विंग इमारतीला अचानक तडे जाऊन ती एका बाजूला झुकल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील धोकादायक व जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी नालासोपारा पूर्वेच्या नालासोपारा पूर्वेकडील ओम नगर परिसरातील ‘दुर्गेश्वरी अपार्टमेंट’च्या ‘सी’ विंग इमारतीला अचानक तडे जाऊन ती एका बाजूला झुकल्याची घटना समोर आली होती. इमारत झुकल्याची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल, सहाय्यक आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी इमारतीमधील ६५ कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांचे नवजीवन येथील एका शाळेत तात्पुरते स्थलांतर केले.
१० वर्षे जुनी इमारत; होणार स्ट्रक्चरल ऑडिट
अतिशय धक्कादायक बाब म्हणजे ही इमारत अवघी १० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. इतक्या कमी कालावधीत इमारतीला तडे जाऊन ती झुकल्यामुळे बांधकामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर इमारत १० वर्षे जुनी असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे. या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असून, अहवाल आल्यानंतरच नेमका काय प्रकार घडला आहे हे स्पष्ट होईल अशी माहिती वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
वसई-विरार शहरात गेल्या काही काळापासून जुन्या आणि अल्पावधीतच जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात विरारमध्ये ‘रमाबाई अपार्टमेंट’चा भाग कोसळून १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घटनेची आठवण ताजी असतानाच, आता ‘दुर्गेश्वरी अपार्टमेंट’च्या रूपाने आणखी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. शहरात आजही अनेक ठिकाणी जुन्या आणि कमकुवत इमारतींमध्ये नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत.
