वसई:नालासोपारा पूर्वेतील उड्डाणपूल ते महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळा सुरू होताच या मुख्य मार्गावरील संतोष भुवन, धानिवबाग, तुळींज, वालईपाडा, वाकणपाडा आणि बिलालपाडा या सर्वच भागांत मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडेला पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटार व्यवस्था नसल्यामुळे अवघ्या काही मिनिटांच्या पावसात हा रस्ता पूर्णपणे जलमय होतो.

​या साचलेल्या पाण्यात आणि खड्ड्यांमध्ये वाहने बंद पडत असल्याने चालकांना आपल्या गाड्यांना धक्का मारत न्यावे लागत आहे. खड्ड्यांमुळे वारंवार दुचाकीस्वारांचे अपघात घडत असून, वाहने बंद पडण्याच्या घटनांमुळे दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दररोज मोठ्या संख्येने होणाऱ्या वाहनांच्या वर्दळीच्या या मार्गावर नागरिकांना अतिशय धोकादायक प्रवास करावा लागत असून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

​महापालिका प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे रस्ता अत्यंत धोकादायक बनल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या दयनीय अवस्थेच्या निषेधार्थ त्रस्त नागरिकांनी रस्त्यावरील पाण्यात बसून अनोखे आंदोलन केले व जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, या वाढत्या असंतोषानंतर महापालिकेकडून आता जागोजागी खड्डे दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे