वसई: वसई विरार शहरात आग दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास नालासोपारा फाटा परिसरातील चॅम्पियन कंपाउंडमधील एका प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

नालासोपारा फाटा येथील चॅम्पियन कंपाउंड परिसर आहे. त्यात विविध प्रकारचे औद्योगिक कारखाने आहेत. त्यातील प्लास्टिक तयार करण्याच्या कारखान्यात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. या आग दुर्घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.या घटनेची माहिती स्थानिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार प्लास्टिक साहित्य असल्याने आगीने काही प्रमाणात वेग घेतल्याचे सांगितले जात आहे. आगीच्या धुरांचे उंचउंच लोट हवेत उसळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकले नाही.ही आग दुर्घटना पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरात एकापाठोपाठ एक अशा आगीच्या दुर्घटना समोर येत असल्याने शहरातील अग्नि सुरक्षे बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.