वसई: नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एका भरधाव टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने समोरील रिक्षा आणि दुचाकी अशा चार वाहनांना एकापाठोपाठ एक जोरदार धडक दिली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात इतका भयानक होता की, टँकरच्या धडकेमुळे दोन रिक्षाचा चक्काचूर झाला आणि रिक्षाचालक आत अडकून पडला. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत रिक्षात अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चौघांना नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी जवळील वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताच्या वेळी योगायोगाने माजी आमदार राजेश पाटील यांचे वाहनही पुलावरून जात होते. टँकरच्या धडकेचा फटका त्यांच्या वाहनालाही बसला असून गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे; मात्र सुदैवाने माजी आमदारांना कोणतीही इजा झाली नसून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. अपघातानंतर राजेश पाटील यांनी तातडीने आपले वाहन थांबवून स्थानिकांसोबत जखमींना मदत केली आणि त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला.
अचानक झालेल्या या अपघातामुळे उड्डाणपुलावर काही काळ मोठा गोंधळ उडाला होता. अपघाताच्या भीषणतेमुळे पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी पोलीस सध्या अपघाताचा सखोल तपास करत आहेत.
