वसई : नालासोपाऱ्यात गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला. रविवारी सकाळी नालासोपारा येथील आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्टिन कॉम्प्लेक्सजवळ ही अपघाताची घटना घडली.
रविवारी सकाळी ११ च्या सुमारास कृष्णा विश्वकर्मा हे दुचाकीवरून वसई लिंक रोडच्या दिशेने जात होते. मार्टिन कॉम्प्लेक्सजवळ त्यांची दुचाकी आली असता भारत गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर दुचाकी ट्रकखाली आल्याने कृष्णा विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील अन्य एक जण जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात आचोळे पोलीस ठाण्यात दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
