वसई: वसई विरार महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नालासोपारा पश्चिमेकडील शनी मंदिराजवळील एका गोशाळेवर शुक्रवारी सकाळी कारवाई केली. मात्र ही कारवाई अत्यंत निष्काळजीपणे करण्यात आल्याने कारवाई दरम्यान गायीचे शिंग तुटून ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमीं यांच्या मार्फत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नालासोपारा पश्चिमेच्या भागातून विरार नालासोपारा बायपास रस्ता गेला आहे. या रस्त्याच्या शेजारीच शनीमंदिरा जवळ अनधिकृत बांधकाम करून त्या ठिकाणी गोशाळा उभारण्यात आली होती.

या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी सकाळी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक गेले होते.ही कारवाई करताना त्या गोशाळेत असलेल्या पशुधन बाजूला करून कारवाई करणे आवश्यक होते. मात्र अतिशय निष्काळजीपणे ही कारवाई केली. त्यामुळे एका गायीला जेसीबीचा जबर फटका बसला. गोशाळेचे कर्मचारी हरिलाल पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसीबी थेट गायीवर चालवण्यात आल्यामुळे तिचे शिंग तुटले त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तातडीने पशु वैद्याला बोलावून जखमी गायीवर उपचार करण्यात आल्याची माहिती गोशाळा कर्मचारी हरीलाल पाल यांनी सांगितले आहे. या घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.या घटनेमुळे शहरातील पालिका प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर आणि प्राण्यांच्या सुरक्षेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आमदार राजन नाईक यांची कारवाईची मागणी

संपूर्ण प्रकरणावर नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला असून पालिकेच्या या कारवाईचा जाहीर निषेध केला आहे.ज्या अधिकाऱ्यांच्या प्रभागात राजरोसपणे मोठी आणि अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, त्याकडे हे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. मात्र, दुसरीकडे एका गोशाळेवर एवढ्या निर्दयीपणे कारवाई केली जाते, हा कुठला न्याय? असा प्रश्न आमदार नाईक यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे. तसेच वसई-विरार महापालिका आयुक्तांचीही भेट घेऊन अशा मुजोर अधिकाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे.

गायी सुरक्षित स्थळी हलविल्याचा महापालिकेचा दावा

महापालिकेच्या निष्काळजीपणे ही घटना घडल्याचा आरोप महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. हा आरोप अत्यंत चुकीचा आहे. ही कारवाई सुरू करण्यापूर्वी तीस पेक्षा अधिक कर्मचारी घेऊन त्यातील सर्व पशुधन (गायी) बाहेर काढण्यात आल्या होत्या. या कारवाईचे सर्व चित्रण ही आम्ही केले आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ( अतिक्रमण) दीपक सावंत यांनी सांगितले आहे. अन्य कोणत्या कारणामुळे गाय जखमी झाली असावी असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.