वसई: आग प्रतिबंधक यंत्रणा बंद असणे आणि आपत्कालीन मार्ग बंद ठेवल्याच्या निष्काळजीपणामुळे नालासोपारा येथील ‘इम्पेरियल हाइट्स’ या इमारतीत घडलेल्या आग दुर्घटनेत दोन महिलांचा गुदमरून मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात इमारतीचे विकासक ‘श्री गणेश व्हेंचर’ कंपनीचे मालक गंगाराम मुकुंद आणि त्यांच्या भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​१४ ऑक्टोबर रोजी रात्री ‘इम्पेरियल हाइट्स’च्या ‘बी’ विंग इमारतीत भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला, तर चार जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेनंतर शहरातील इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय प्रतिनिधींकडून सखोल चौकशी व कठोर कारवाईची जोरदार मागणी केली जात होती.

​त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. तपासादरम्यान इमारतीतील हायड्रंट, स्प्रिंकलर सिस्टीम, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म आणि अग्निरोधक यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याचे उघडकीस आले. तसेच आणीबाणीच्या वेळी सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी असलेला टेरेसचा दरवाजा आणि ‘एस्केप रूट’ देखील बंद ठेवण्यात आला होता. या सर्व सुरक्षायंत्रणा बंद असल्यानेच ही जीवितहानी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

​या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय गर्जे यांच्या तक्रारीवरून इमारतीचे विकासक ‘श्री गणेश व्हेंचर’ या बांधकाम कंपनीचे मालक गंगाराम मुकुंद आणि त्यांच्या इतर भागीदारांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(अ), ३२४(५) आणि ३(५) अन्वये निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे असे आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांनी सांगितले आहे.