वसई: नालासोपारा पश्चिमेच्या कळंब ते निर्मळ रस्त्यावरील खाडीपुलावर दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याची १९ वर्षीय मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. इब्राहीम मुमताज शेख असे मयत तरुणाचे नाव असून तो नालासोपारा पूर्वेच्या बिलालपाडा परीसरात राहत होता.

९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास इब्राहीम शेख हा त्याची मैत्रीण स्नेहा सुरज गायकवाड (१९) हिच्या सोबत दुचाकीवरून कळंब ते निर्मळ रस्त्याने जात होता. कळंब येथील खाडी पुलावर पोहचताच इब्राहीमचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पुलाच्या संरक्षक कटड्याला जोरदार धडकली.

​या भीषण अपघातात इब्राहीमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर स्नेहा हिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच दोघांना तातडीने वसईतील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी वसई महापालिकेच्या सर डी. एम. पेटिट रुग्णालयात हलवण्यात आले.

​मात्र उपचारादरम्यान १० ऑगस्ट रोजी पहाटे १.४० वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी इब्राहीम याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.