वसई: बायकोच्या व्हॉट्सअप स्टेटस वर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेल्या पतीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथे ही घटना घडली. आफताब शेख (२४) असे या मयताचे नाव आहे. पंधरा दिवसातील शहरातील ही पाचवी हत्येची घटना आहे.
नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथे आफताब शेख (२४) हा पत्नी शबाना शेख (२२) हिच्यासोबत रहात होता. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे फातिमा शबानाने आपल्या व्हाट्सअप वर स्टेटस ठेवले होते. ते स्टेटस पाहून मेहंदी हसन शेख (२२) याने कमेंट केली होती. याच मुद्द्यावरून त्यानंतर मेहंदी याने शबानाला इंस्टाग्राम या समाज माध्यमावर अश्लील शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी शबाना शेख आणि तिचा नवरा आफताब शुक्रवारी सकाळी नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथील मेहंदी हसनच्या घरी गेले. त्यावेळी तेथे वाद झाला याच वादातून मेंहदीने चाकूने आफताब शेख याच्यावर वार केले. या हल्ल्यात आफताबचा जागीच मृत्यू झाला.
नालासोपारा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मेहंदी हसन शेख याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितले आहे. अटक केलेला आरोपी हा तो सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याला पोक्सोच्या अंतर्गत तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.वसई विरार मध्ये सातत्याने हत्येच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
फेब्रुवारी महिन्यातील घटना
१५ फेब्रुवारी २०२६ – वसईच्या उमेळमान येथील बऱ्हामपूर गावात अल्पवयीन भाच्याने त्याची आत्या अर्थात दुर्गा बनसोड या साठ वर्षीय महिलेची हत्या केली होती.
१६ फेब्रुवारी २०२६ – वसई पश्चिमेतील अंबाडी रोड परिसरात विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याच्या कारणामुळे दोन व्यक्तींमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादातून शरीफ शेख (४७) या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.
२० फेब्रुवारी २०२६ – नालासोपारा दोन गटात झालेल्या वादातून शुभम मिश्रा या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.
२४ फेब्रुवारी २०२६ – नालासोपारा पूर्वेच्या टाकीपाडा येथील सर्वोदय वसाहतीत मंगळवारी पहाटे मनोरुग्ण भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडली होती. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आईवरही मुलाने हल्ला केला होता.
