वसई: वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागातून सातत्याने आग दुर्घटना समोर येऊ लागल्या आहेत. नालासोपारा पूर्व येथील आचोळे परिसरातील चौधरी मेडिकल स्टोअरमध्ये शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.

नालासोपारा पूर्वेच्या भागात चौधरी मेडिकल हे औषध गोळ्या विक्रीचे दुकान आहे. हे दुकान बंद असताना शनिवारी अचानक या दुकानात आग लागली. या आगीच्या घटनेमुळे परीसरात मोठी खळबळ उडाली होती. आगीचे उंच उंच ज्वाळा उसळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

या घटनेची माहिती तेथील नागरिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आगीत औषधांचा मोठा साठा जळून खाक झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेदरम्यान या ठिकाणी आजूबाजूच्या भागातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती..

आगीत गाडी ही जळाली

मेडिकल दुकानाच्या समोरच एक चारचाकी वाहन उभे होते. या आगीच्या घटनेदरम्यान हे वाहन वेळीच बाजूला न केल्याने त्या वाहनाला ही त्या आगीच्या झळा बसून आग लागली होती. त्यामुळे या आगीत चारचाकी वाहनाचा मोठ्या प्रमाणात भाग जळून खाक झाला असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे.