वसई: नालासोपारा पूर्वेकडील ‘बैठक कॅफे’च्या बाहेर किरकोळ वादातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नालासोपारा येथील ‘बैठक कॅफे’च्या समोरील परिसरात मयत १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि १६ वर्षीय आरोपी यांच्यात कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाली. हा किरकोळ वाद पाहता पाहता इतका विकोपाला गेला की आरोपीने संतापाच्या भरात मयताच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि पोटावर बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.याच मारहाणीदरम्यान आरोपीने मयत मुलाची मान डाव्या काखेत घट्ट आवळत त्याला जबरदस्तीने फुटपाथवर ढकलत खाली पाडले. या मारहाणीत अल्पवयीन मुलाच्या डोक्याच्या मागील बाजूस मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी नालासोपारा येथील नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सुरुवातीला याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात केवळ अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी व तपासणी केल्यानंतर अल्पवयीन मुलाची हत्या झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तातडीने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपी हा विधीसंघर्ष बालक असल्यामुळे त्यास पालकांच्या ताब्यात देऊन पोलीस नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाईसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
