वसई: विलंबाने धावणाऱ्या बसेस, सुट्टीच्या दिवशी रद्द करण्यात आलेली बसफेरी व बसची तासंतास करावी लागणारी प्रतिक्षा यामुळे नालासोपाऱ्यातील नाळे गावातील बस प्रवाशांची परवड होत आहे. अतिरिक्त पैसे खर्च करून रिक्षाने प्रवास करावा लागत असल्याने अतिरिक्त खर्चाचा भार सहन करावा लागत असल्याने नागरिकांना संताप व्यक्त केला आहे.
नालासोपारा पश्चिमेला नाळा गाव वसलेले आहे. या गावात वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाकडून बससेवा पुरवली जाते. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार नाळा मार्गावर नियमितपणे दोन बसफेऱ्या उपलब्ध असतात. मात्र, रविवारी अनेकदा केवळ एकच बस चालविली जाते. त्यामुळे प्रवाशांना तासंतास बसची प्रतीक्षा करावी लागते. दोन बसफेऱ्या चालविणे शक्य नसल्यास किमान दोन्ही बससेवांमध्ये अर्ध्या तासाचे अंतर ठेवून रविवारीही प्रवाशांना नियमित सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
यासंबधी ज्येष्ठ समाजसेवक चार्ली रोझारिओ यांनी महापौर मार्शल लोपीस यांच्याकडे निवेदनही सादर केले आहे. तसेच रात्री पुरेशी बससेवा उपलब्ध नसल्यामुळे कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना बराच वेळ बसची वाट पहावी लागते किंवा रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सकाळच्या सत्रात नालासोपारा येथून दुपारी १२.२० वाजता आणि रात्रीच्या सत्रात नालासोपारा येथून शेवटची बस रात्री ९.२० ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान नाळा गावासाठी सोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे मुंबईहून उशिरा परतणाऱ्या तसेच गावाकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे रोझारिओ यांनी म्हटले आहे.
तसेच स्वतःला आलेला अनुभवही रोझारिओ यांनी निवेदनात नमूद केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी ते नाळा गावाहून नालासोपारा रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी बसमधून प्रवास करत होते. ही बस नालासोपारा येथून रात्री सुमारे ८.३० वाजता नाळा गावाकडे जाते आणि त्यानंतर नाळा येथून नालासोपारा दिशेने परतते. मात्र, संबंधित बस नालासोपारा बसस्थानकापर्यंत न नेता पाटणकर पार्क परिसरातून थेट चार्जिंग स्टेशनकडे वळविण्यात आल्याने प्रवाशांना मध्येच उतरावे लागले.
परिणामी अनेक प्रवाशांना नालासोपारा रेल्वे स्थानक गाठण्यासाठी स्वतंत्र रिक्षाचा आधार घ्यावा लागला आणि त्यांचा वेळ व अतिरिक्त पैसे खर्च झाले. त्यामुळे नाळा मार्गावरील बससेवेतील त्रुटी तातडीने दूर करून रविवारी नियमित बसफेऱ्या सुरू ठेवाव्यात, तसेच शेवटची बस नियोजित ठिकाणापर्यंत न्यावी आणि भविष्यात प्रवाशांना अर्ध्या वाटेत सोडण्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक चार्ली रोझारिओ यांनी केली आहे.
