वसई:- नालासोपारा पूर्वेच्य अचोळे मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवात रविवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आणि काठ्या व बांबूच्या साहाय्याने हल्ला करण्यात आला. या घटनेत सुमारे १० जण जखमी झाले असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अचोळे येथे नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना एका अरुंद रस्त्यावरून दुचाकीस्वार आणि टेम्पो चालकामध्ये वाद झाला. या वादातून मंडळाच्या सदस्यांनी दुचाकीस्वाराला मारहाण करून तेथून हाकलून दिले. त्यानंतर तो दुचाकीस्वार आपल्या समर्थकांसह परत आला आणि त्यांनी मंडळाच्या सदस्यांवर दगड, काठ्या व बांबूने हल्ला केला.

​जखमींना उपचारासाठी वसई-विरार महानगरपालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी रविवारी उशिरा हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

​जखमी मंडळ सदस्यांपैकी एक असलेल्या विशाल सिंग यांनी आरोप केला की, कृष्णा नावाच्या दुचाकीस्वाराने वाद घातल्यामुळे त्याला मंडळाच्या सदस्यांनी तेथून हाकलून दिले होते. त्यानंतर त्याने सोबत १० ते १५ जणांना घेऊन काठ्या आणि बांबू घेऊन परत आला. त्यांनी आमच्यावर दगडफेक केली आणि मंडळाच्या मूर्तीचेही नुकसान केले असा आरोप सिंग यांनी केला.

​या हाणामारीत जखमी झालेल्या एका महिलेचा दावा आहे की, सुमारे ५० ते ६० लोक घटनास्थळी आले आणि ती तिथे उभी असताना तिच्यावरही हल्ला केला. ​मात्र कृष्णाचा मित्र असल्याचा दावा करणाऱ्या शिव यादव यांनी या घटनेची दुसरी बाजू मांडली. त्यांनी आरोप केला की, मंडळाने रस्त्यावरून जाण्यासाठी पुरेशी जागा सोडली नव्हती. रस्त्या अरुंद असल्यामुळे दुचाकीस्वार माझा मित्र कृष्णा याच्यासोबत टेम्पो चालकाचा वाद झाला. मंडळ सदस्यांनी त्याला मारहाण केली, म्हणून आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो होतो असे यादव यांनी सांगितले.

नवरात्री उत्सवाच्या सुरुवातीलाच नालासोपाऱ्यात वादविवादाचा प्रसंग निर्माण झाल्याने उत्सवाला गालबोट लागले आहे.