वसई:- मागील काही दिवसांपूर्वी पेल्हार परीसरात दोन गटात झालेल्या मारहाणीत शादाफ नावाचा तरुण गंभीर जखमी झाला होता. मात्र शनिवारी त्याचा उपचारादरम्यान मुंबईच्या रुग्णालयात मृत्यू झाला. या मृत्यूच्या घटनेनंतर नागरिकांनी संतप्त होत रात्री पेल्हार पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार वाकनपाडा येथील भागात दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. याच झालेल्या वादातून एकमेकांना मारहाण करीत चाकू हल्ला ही करण्यात आला होता. या हल्ल्यात शादाफ नावाचा तरुण व अन्य साथीदार जखमी झाले होते. या मारहाण प्रकरणी पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
शादाफ हा गंभीर जखमी असल्याने त्याला मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र २५ दिवसानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूच्या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत या तरुणाचा मृतदेह रुग्णवाहिकेत घेऊन थेट पेल्हार पोलीस ठाण्याला घेराव घालत आंदोलन केले. पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल केला आहे.
मात्र यातील आरोपीला अजूनही अटक केली नाही व त्यावर पुढील कारवाई केली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पोलिसांनी शादाफ या तरुणाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आंदोलन कर्त्या नागरिकांनी केली.या प्रकारामुळे काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जे यातील आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसेच या प्रकारचा पुढील तपास ही सुरू असल्याची माहिती पेल्हार पोलिसांनी दिली आहे.
