वसई : वसई-विरार शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी पूरस्थिती अद्याप कायम आहे. अनेक भागांतील पाणी अद्याप ओसरलेले नाही, तर काही भागांत तब्बल ७२ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. यामुळे बुधवारी नालासोपार्यात संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.
वसई विरार शहरात आठवडा भरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून गेल्या चार दिवसांपासून शहरातील अनेक भाग पुराच्या पाण्याने वेढले आहेत. महावितरणची मुख्य उपकेंद्रे, अनेक रोहित्रे, वीज वितरण पेट्या पूराच्या पाण्याखाली गेल्याने शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. नालासोपारा येथील छेडा नगर, पाटणकर पार्क, यशवंत गौरव, हनुमान नगर, साई धाम, चंदन नाका, अलकापुरी, अग्रवाल नगरी या भागात ७२ तासांहून अधिक काळ वीज नसल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. तर दुसरीकडे इंटरनेट ही सुरू नसल्याने पूर्णपणे संपर्क तुटला आहे.
याशिवाय वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा उद्रेक बुधवारी नालासोपारा शहरात दिसून आला. बुधवारी मोरेगाव येथे संतप्त नागरिक स्त्यावर उतरले. त्यांनी रस्ता अडवून प्रशासन आणि महावितरणविरोधात घोषणाबाजी केली. असाच प्रकार आचोळे आणि संतोषभुवन परिसरातही घडला.
गेल्या चार दिवसांपासून वीज नाही. लहान मुलांचे प्रचंड हाल होत आहेत, अशी व्यथा एका महिलेने व्यक्त केली. गेल्या २५ वर्षांत अशी परिस्थिती कधीच पाहिली नव्हती. दैनंदिन वापरासाठीही पाणी उपलब्ध नाही. नगरसेवक केवळ मत मागण्यासाठी येतात, त्यानंतर नागरिकांकडे फिरकतही नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला. जोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, असा इशारा आंदोलक नागरिकांनी दिला. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य पाहून महावितरणाच्या कर्मचार्यांना पाचारण केले आणि काही वेळात या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्यानंतर जमाव शांत झाला.टप्प्या टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
