वसई:- नालासोपारा पूर्वेच्या राधानगर परीसरात मंडप डेकोरेशनच्या साहित्य ठेवण्यात आलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. रविवारी दुपारी २.३० वाजता ही घटना घडली. या आगीत मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

नालासोपारा पूर्वेच्या राधानगर परीसरात एका मंडप व्यावसायिकाचे गोदाम आहे. त्या गोदामात रविवारी दुपारी अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. या आग दुर्घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली होती. भर दुपारच्या वेळेत आगीच्या ज्वाला भडकत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी दाखल झाले. तीन अग्निबंब वाहनांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.

या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले आहे. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.