वसई:- नुकताच पार पडलेल्या वसई विरार महापालिकेच्या महासभेत शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्याबाबत आणि विविध स्मारकांच्या उभारणीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. याच दरम्यान नालासोपारा शहराचे नाव बदलून ‘शूर्पारक नगरी’ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आल्यानंतर महापौर अजीव पाटील यांनी बोलताना याबाबत आम्ही सुद्धा सकारात्मक आहोत तसेच केवळ नालासोपारा नव्हे तर वसई विरार महापालिकेचे नाव शूर्पारक करण्याचा प्रस्ताव असून त्यादृष्टीने कायदेशीर बाबी पडताळल्या जात असल्याचे महासभेत सांगितले.

शूर्पारक नगरी (आजचे नालासोपारा) हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिका क्षेत्रातील एक अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक स्थान आहे. प्राचीन काळी ही नगरी कोकण प्रांताची राजधानी म्हणून ओळखली जात असे. ​नालासोपारा येथे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा बौद्ध स्तूप असून, या स्थानाला ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला आहे. आज जरी नालासोपारा हे मुंबईचे एक उपनगर मानले जात असले, तरी प्राचीन काळी ते पश्चिम भारतातील सर्वात मोठे आणि समृद्ध आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून ओळखले जात होते.

या नगरीला साडेचार हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे नालासोपाऱ्याचे नाव बदलून ते शूर्पारक नगरी करा अशी मागणी नुकताच झालेल्या महासभेत करण्यात आली. सद्यस्थितीत नालासोपारा शहराची विविध माध्यमातून बदनामी होत असते. तर दुसरीकडे संपूर्ण भारतातील लोकं शूर्पारक नगरी शोधत येतात. पण नालासोपारा स्थानक वगळता काही सापडत नाही, असे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी सांगितले. ऐतिहासिक वारसा जतन होण्याच्या दृष्टीने यावर सकारात्मक विचार व्हावा असेही पाटील यांनी सांगितले.

त्यावर उत्तर देताना नालासोपाऱ्याचे नाव शूर्पारक करण्याच्या दृष्टीने सकारात्मक असल्याचे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले. तसेच यापूर्वी राज्याचे तत्कालीन सचिव गायकवाड असताना या विषयावर चर्चा झाली होती. तेव्हा वसई विरार महापालिकेचे नाव ही शूर्पारक करावे विचार पुढे आला होता. त्यादृष्टीने सुद्धा कायदेशीर प्रक्रिया पडताळून पाहिल्या जात आहेत, असे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले.

नालासोपारा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची प्रस्ताव

नालासोपारा रेल्वे स्थानकाचे नाव ही शूर्पारक नगरी असे करण्यात यावे याबाबत प्रस्ताव तयार करून केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते मनोज पाटील यांनी केली आहे. यापूर्वी सुद्धा पाटील यांनी मुख्यमंत्री व केंद्रसरकार कडे नामकरणाबाबतची मागणी केली होती.

महापुरुषांची स्मारके व वास्तू निर्माण होणार

​छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व इतर महापुरुषांच्या आदरार्थ शहरात विविध प्रेरणादायी वास्तू व पुतळे उभारण्याबाबत ठरले तसेच, नरवीर चिमाजी आप्पा यांच्या पराक्रमाचे स्मरण ठेवण्यासाठी विरार व नालासोपारा शहरात त्यांचे भव्य स्मारक व पुतळा उभारण्याची सूचनाही सभागृहात मांडण्यात आली.