वसई: नालासोपारा पश्चिमेकडील कळंब येथील एका प्रसिद्ध फार्म हाऊसमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. आई-वडील कामात व्यस्त असताना, अवघ्या १३ महिन्यांचा चिमुरडा खेळता- खेळता स्विमिंग पूलमध्ये पडल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष दशरथ ईभाड असे या मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे डहाणू तालुक्यातील कोसबाड (वरईपाडा) येथील रहिवासी असलेले दशरथ शिणवार ईभाड (३२) व त्याची पत्नी हे कळंब येथील ‘तुलसी फार्म हाऊस’मध्ये मजुरीचे काम करतात. २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास फार्म हाऊसवर ग्राहकांची मोठी गर्दी होती. यावेळी दशरथ ईभाड हे ग्राहकांना सांभाळण्यात व्यस्त होते, तर त्यांची पत्नी अनुषा ही किचनमध्ये भांडी घासण्याचे काम करत होती.

​सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पत्नीने १३ महिन्यांचा मुलगा आयुष याला पती दशरथ यांच्याकडे आणून दिले होते. मात्र, फार्म हाऊसवर गर्दी असल्याने मुलाचे वडील दशरथ हे ग्राहकांकडे गेले. मुलगा किचनजवळच खेळत असल्याने तो पत्नीकडे गेला असावा, असा दशरथ यांचा समज झाला. मात्र, साधारण १० ते १५ मिनिटांनंतर मुलाचा शोध घेतला असता, तो फार्म हाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये पडलेला आढळून आला. त्याला​ कुटुंबीयांनी आणि फार्म हाऊसवर काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी बालकाला तातडीने पाण्याच्या बाहेर काढले.

फार्म हाऊसचे मालक अंकुर अनिल मेहेर यांना घटनेची माहिती देऊन तातडीने बोलावून घेण्यात आले. यानंतर मालक अंकुर मेहेर आणि वडिलांनी मिळून आयुषला तातडीने निर्मल येथील सदानंद हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु, तिथल्या डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याने त्याला मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. ​त्यानंतर बालकाला तातडीने वसई पश्चिमेकडील कार्डिनल ग्रेशिअस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासणी अंती रात्री ८ वाजेपूर्वीच त्याला ‘मृत’ घोषित केले. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले आहे.

दहा ते बारा दिवसांपूर्वी विरार अर्नाळा येथील मंथन रिसॉर्टच्या स्विमिंग वेवपूल मध्ये सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. सातत्याने बुडून मृत्यू होण्याच्या घटना समोर येत असल्याने स्विमिंगपूल मधील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न समोर येत आहे.

चालू वर्षातील घटना

१७ मे २०२६ रोजी विरार नवापूर येथील मंथन रिसॉर्टमधील तरण तलवात बुडून मुंबई भांडुप येथे राहणाऱ्या लवित रामजीत यादव (७) या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. २० मार्च २०२६ रोजी रिसॉर्ट मध्ये खेळताना पंधरा वर्षीय आर्यन कानोकिया हा जखमी झाला होता. त्यानंतर त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.