वसई: मुंबईला लागूनच असलेल्या नालासोपारा शहरात रिक्षाचालकांच्या मुजोरीचे प्रमाण अधिकच वाढू लागले आहे. अधूनमधून रिक्षाचालक यांच्यात क्षुल्लक वादातून हाणामारी झाल्याच्या घटना समोर येत आहेत
आता पुन्हा एकदा नालासोपारा स्थानकाजवळील उड्डाणपुला खाली रिक्षाचालकांमध्ये भर रस्त्यात हाणामारी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकाराबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
नालासोपारा परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या नागरिकांच्या गर्दीसह रिक्षा चालकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे स्थानक परिसरासह मुख्य रस्त्यावर रिक्षांच्या बेशिस्त रांगामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. यामुळे रस्त्यावरून ये जा करणारे पादचारी तसेच वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
तर दुसरीकडे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. काही या कोंडीचा फटका रुग्णवाहिकांना बसत आहे.नालासोपाऱ्यात रिक्षाचालकांचा मनमानीपणा व दादागिरीचे प्रमाण ही प्रचंड वाढले आहे. यावर पोलीस प्रशासनाचा कोणताही अंकुश राहिला नसल्याने भर रस्त्यात वादविवाद होण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
काही दिवसांपूर्वी दोन रिक्षाचालकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या उड्डाणपुला खाली भर रस्त्यातच रिक्षाचालकांमध्ये राडा झाला. याचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या राड्यात रिक्षा चालक आपापसात वाद घालताना दिसून येत आहेत. एका रिक्षा चालकाला पकडून पाच सहा रिक्षावाले मारहाण करताना दिसून येत आहेत.या घटनेमुळे काही काळ या भागात तणावाचे वातावरण होते. याशिवाय वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. सातत्याने अशा घटना समोर येत असताना पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा वचक राहिला नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
बेसुमार रिक्षांमुळे वाहतुकीला अडथळे
गेल्या काही काळात नालासोपारा शहरात रिक्षांची संख्या अतिशय वेगाने वाढली आहे. वैध रिक्षाचालकांसह अवैध रिक्षाचालकही आता प्रवासी वाहतूक करू लागले आहेत. त्यामुळे अनेकदा प्रवाशांची ने-आण, अवैध रिक्षाथांबे अशा विविध कारणांवरून रिक्षाचालकांमध्ये वाद होत असतात. तर पोलिसांकडूनही या वादांकडे कानाडोळा केला जात असल्यामुळे या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोपही आता नागरिक करू लागले आहेत.
