वसई:- एका श्वानाला झालेल्या मारहाणीचे पडसाद नालासोपार्याच्या श्रीराम नगर परिसरात उमटले. सुमारे ५० ते ६० जणांच्या टोळक्याने श्रीराम नगर मधील घरावरं लोखंडी सळ्या, रॉड आणि दगडफेक करून हल्ला केला. या हल्ल्यात ३० ते ३५ घरांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी श्रीराम नगर मध्ये बंदोबस्त ठेवला असून याप्रकरणी ४० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नालासोपारा पूर्वेच्या श्रीराम नगर मध्ये सोमवारी रात्री ९ च्या सुमारास ५० ते ६० जण हातात लाठ्या, लोखंड़ी रॉड आणि सळ्या घेऊन शिरले. त्यांनी श्रीराम नगर मधील ८ ते ९ चाळीतील घरांवर अचानक हल्ला सुरू केला. हल्लेखोरांनी घराच्या खिडक्यांच्या काचा, मीटर बॉक्स, दुचाकी तसचे अन्य साहित्यांचे नुकसान केले आहे.
घटनेची माहिती मिळलाच वरिष्ठ पोलीस अधिकारी कुमक घेऊन घटनास्थळी पोहोचेले. या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी राजवीर सरदार, रणवीर सरदार, निलेश गुप्ता आदींसह ४० जणांविरोधात दंगल, धमकी, बेकायदेशीर जमाव, अतिक्रमण,हल्ला करणे, मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. अद्याप कुणाला अटक करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पेल्हार पोलिसांनी दिली आहे.
रविवारी रात्री संतोषभुवन येथे राहणारा रितेश दुबे हा श्रीराम नगर मधून जात असताना त्याने गल्लीतील एका श्वानाला लाथ मारली होती. त्यामुळे श्रीराम नगर मधील राहणार्या ५-६ जणांनी दुबे याला श्वानाला का मारले म्हणून मारहाण केली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराडे यांनी सांगितले. या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे असेही पोलिसांनी सांगितले. या घडलेल्या घटनेनंतर चाळ वस्तीत राहणाऱ्या घरांवर अचानकपणे झालेल्या हल्ल्या मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
