वसई: नालासोपारा पश्चिमे येथील सोपारा जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी दुपारी घडलेल्या भीषण कुकर स्फोट प्रकरणी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेत दोन शाळकरी विद्यार्थी आणि स्वयंपाक करणारी महिला गंभीर जखमी झाली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

​मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास शाळेत विद्यार्थ्यांना मध्यान्हभोजन देण्याची तयारी सुरू होती. स्वयंपाकगृहात मोठ्या कुकरमध्ये खिचडी शिजवली जात असताना अचानक प्रचंड दाबाने कुकरचा स्फोट झाला. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे कुकरमधील उकळती खिचडी थेट बाहेर फेकली गेली. नेमक्या त्याच वेळी जेवणाच्या रांगेत उभे असलेले गौतम गुड्डू प्रसाद (११)इयत्ता ५ वी आणि आयुष चौधरी (९) इयत्ता ३ री हे दोन विद्यार्थी तसेच स्वयंपाक करणाऱ्या पूनम मंगेश कदम (३२) यांच्या अंगावर ही उकळती खिचडी उडाली. यात तिघेही गंभीररीत्या भाजले गेले.

​घटनेची गांभीर्याने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांना तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या तिघांनाही अधिक उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.या विद्यार्थ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च जिल्हा परिषदेमार्फत केला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आमदारांकडून दोषीवर कारवाईची मागणी

​नालासोपारा येथील जिल्हा परिषद शाळेत कुकर स्फोटात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात न नेता मुख्याध्यापिकेने वरिष्ठांना न कळवता पालकांसोबत घरी पाठवून दिले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शाळा प्रशासनाच्या या अक्षम्य निष्काळजीपणावर आणि बेजबाबदार वृत्तीवर आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.