वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून नालासोपारा येथे सुरू असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामात कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सांडपाणी वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते वेळेत दुरुस्त न केल्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण परिसरात खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी गुरुवारी थेट चिखलात बसून अनोखे आंदोलन केले.
वसई-विरार शहरात एकूण ७ सांडपाणी प्रकल्प मंजूर करण्यात आले असून सध्या केवळ विरारच्या बोळींज येथील प्रकल्प कार्यरत आहे, जिथे दररोज ३० दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, उर्वरित सांडपाणी प्रक्रियेविनाच समुद्रात सोडले जात असल्याने पालिकेने नालासोपारा पूर्वेला १०३ दशलक्ष लीटर क्षमतेचा व ४३४ कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे.
या कामाचा ठेका ‘इगल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला देण्यात आला आहे. या कामासाठी नालासोपारा पूर्व परिसरात जागोजागी रस्ते खोदण्यात आले. परंतु, वाहिन्या टाकल्यानंतर कंत्राटदाराने रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती न करता हलगर्जीपणा दाखवला.
पावसाळा सुरू होताच प्रभाग क्रमांक १५, १७, २१ आणि २२ मधील रस्त्यांची दुरवस्था अधिकच बिकट झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे, साचलेला चिखल, आणि लागणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे आणि वाहनचालकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून अपघाताचा धोकाही कमालीचा वाढला आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप भाजपचे गटनेते व नगरसेवक अशोक शेळके यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, महापालिकेने या कंत्राटदाराला काम वेळेत आणि योग्य प्रकारे न केल्याबद्दल आतापर्यंत १३ नोटीसा बजावल्या आहेत. मात्र, तरीही कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याऐवजी पालिका प्रशासन त्याला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला आहे.”महापालिका प्रशासनाने तातडीने जागे होऊन नागरिकांना सुस्थितीतील रस्ते उपलब्ध करून द्यावेत. जोपर्यंत कंत्राटदार एसटीपी प्रकल्पाचे काम तात्पुरते थांबवून प्रथम रस्त्यांची पुनर्बांधणी व दुरुस्ती करत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवावे असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
