वसई:- वसई विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा टँकर अपघाताच्या घटना समोर येत आहेत. नालासोपारा पूर्व येथील तुळींज रस्त्यावर एका भरधाव टँकरच्या धडकेत १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आर्यन अभय सिंग असे मयत मुलाचे नाव असून या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्यन सिंग हा नालासोपारा पूर्वेच्या साई वरद अपार्टमेंट टाकीरोड परीसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता.२ नोव्हेंबरला रात्री एकच्या सुमारास साहिल शिवाजी खोपडे हा त्यांचा मित्र आर्यन अभय सिंग याला सोडण्यासाठी आपल्या दुचाकीवरून तुळींज रस्त्यावरून जात होता.
ॲपेक्स टॉवरसमोर पोहोचले असता, त्यांच्या पुढे जाणाऱ्या एका टँकरच्या (क्रमांक एमएच टी २७४३) चालकाने आपल्या टँकर अत्यंत भरधाव वेगाने चालवून अचानक डाव्या बाजूला घेतला. या अचानक झालेल्या वळणामुळे टँकरची धडक दुचाकीला बसली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला आर्यन सिंग हा खाली पडला आणि टँकरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अज्ञात टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यापूर्वी १२ ऑक्टोबर २०२६ विरारच्या प्रसिद्ध जीवदानी देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून जात असताना कविता धर्मेंद्र पाल (२९) आणि आरायू धर्मेंद्र पाल (४) या मायलेकाचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. सातत्याने टँकर अपघाताच्या घटना समोर येत असल्याने टँकरच्या बेदरकारपणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
