वसई : नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा प्रकार समोर आला आहे. नालासोपारा प्लॅटफॉर्म क्रमांक ४ समोरील रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या घाण आणि दुर्गंधीयुक्त पाण्यात एक चहा विक्रेता आपल्या चहाच्या किटल्या धुताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, या बेजबाबदार प्रकारामुळे प्रवाशांमधून आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित चहावाला रस्त्यावरील साचलेल्या अत्यंत अस्वच्छ पाण्यात चहाच्या किटल्या बिनधास्त धुताना स्पष्ट दिसत आहे. नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात आणि यातील अनेक जण स्थानक परिसरातील गाड्यांवर चहा तसेच इतर खाद्यपदार्थांचे सेवन करतात. अशा गजबजलेल्या भागात सार्वजनिक आरोग्याची अशी सरळ-सरळ थट्टा उडवली जात असल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

​पावसाळ्याच्या दिवसांत आधीच साथीच्या आजारांचा धोका वाढलेला असताना, अशा प्रकारे दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर भांड्यांसाठी केल्यामुळे नागरिकांना कॉलरा, टायफॉइड, गॅस्ट्रो यांसारख्या गंभीर आजारांची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

​या धक्कादायक प्रकारानंतर रेल्वे प्रशासन, स्थानिक महापालिका आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित चहाविक्रेत्याचा शोध घ्यावा आणि त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, स्थानक परिसरातील सर्वच खाद्यविक्रेत्यांच्या स्वच्छता आणि अन्न दर्जाची तातडीने तपासणी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.