वसई:- चार महिन्यापूर्वी नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी परीसरात रोहित्राचा स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणच्या तपासणीनंतर नालासोपारा पोलिसांनी महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. रोहित्र देखभाल दुरुस्तीच्या कामात निष्काळजीपणा केला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा गावात डांगेवाडी परिसर आहे. याच भागात वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने रोहित्र बसविले आहे. २२ सप्टेंबर २०२५ रोजी अचानकपणे या रोहित्राला भीषण आग लागून स्फोट झाला होता. या घटनेमुळे आजूबाजूच्या परीसरात मोठी खळबळ उडाली होती. या आगीत जावेद अन्सारी (२८) व नसरीन परवीन शेख (५) असे दोघे जण होरपळून जखमी झाले होते. तर उपचारासाठी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मोठ्या प्रमाणात होरपळून गेल्याने दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला होता. तर या घटनेनंतर महावितरणच्या कारभारावर ही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
या रोहित्राच्या देखभाल करण्यासाठी महावितरणने कर्मचारी नियुक्त केले होते. मात्र त्यांनी देखभालीच्या कामात हलगर्जीपणा केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने अखेर नालासोपारा पोलीस ठाण्यात महावितरणचे कनिष्ठ अभियंता विशाल अशोक बागुल (३८) व तांत्रिक आरिफ शेख (४५) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायदा कलम १०६(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा तपास सुरू असून महावितरणच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना संपर्क करून त्यांची चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
रोहित्र स्फोटाच्या घटना
२० ऑक्टोबर २०२५ – ऐन दिवाळीत विरार पश्चिमेतील तिरुपती फेज दोन परिसरातील पूनम रेसिडेन्सी सोसायटी या रहिवासी इमारतीच्या आवारातील रोहित्राचा अचानक स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
२२ नोव्हेंबर २०२५ – नालासोपारा पूर्वेततील वाकणपाडा परिसरातील सुपर इंडस्ट्रीजमध्ये शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी अचानक रोहित्राचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या आगीत रोहित्र जळून पूर्णपणे खाक झाले होते. तर रोहित्रातून निघणारी आग आसपासच्या परिसरातही पसरली होती. पण, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग आटोक्यात आली होती.
विद्युत लेखापरीक्षणाची गरज
विद्युत लेखापरीक्षण म्हणजे वीज पुरवठ्याची आणि ऊर्जेच्या वापराची तपासणी आणि मूल्यमापन करणे. या प्रक्रियेत वीज बिल, उपकरणांची कार्यक्षमता आणि ऊर्जेचा अपव्यय यांसारख्या गोष्टींचे विश्लेषण केले जाते, जेणेकरून ऊर्जेचा खर्च कमी करता येते आणि कार्यक्षमता वाढवता येते. मात्र गेल्या काही काळात वसई विरार शहरात रोहित्र आणि वीजवाहिन्यांचा स्फोट होण्याच्या, तसेच वीजेचे खांब कोलमडून पडण्याच्या घटना समोर येत असल्यामुळे महावितरणकडून केल्या जाणाऱ्या विद्युत लेखापरीक्षणावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

