वसई:- आजकाल सोशल मीडियावर लक्ष वेधण्यासाठी किंवा रील बनवण्यासाठी रेल्वे स्थानकांत व चालत्या गाड्यांमध्ये जीवघेणे स्टंट करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. बुधवारी नालासोपारा आणि वसई रोड स्थानकादरम्यान एका तरुणाने थेट चालत्या लोकलसमोर येऊन ट्रेन रोखण्याचा अत्यंत धोकादायक प्रयत्न केला. या संपूर्ण धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्याकडून यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पश्चिम रेल्वे ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते, ज्यातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, बुधवारी घडलेल्या या प्रकाराने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण रुळावर ठाम उभा राहून लोकल रोखण्याचा प्रयत्न करत होता. ट्रेनमधील मोटरमन आणि प्रवाशांनी त्याला वारंवार बाजूला होण्याचे आवाहन केले; मात्र, तो तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
सुदैवाने, मोटरमनने क्षणाचाही विलंब न करता तातडीने ‘इमर्जन्सी ब्रेक’ लावले आणि गाडी तरुणापासून अवघ्या काही अंतरावर थांबली. मोटरमनच्या या सतर्कतेमुळे भीषण अपघात टळला.तथापि, तरुण बाजूला होत नसल्याचे पाहून शेवटी एका प्रवाशाने लोकलधून खाली उतरून त्याच्या कानशिलात लगावली आणि त्याला रुळावरून बाजूला खेचले. या संपूर्ण प्रकारामुळे काही काळ लोकल वाहतूक ठप्प होऊन प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.
रेल्वेच्या सूचनांकडे दुर्लक्ष
रेल्वे प्रशासनाकडून सर्व नागरिक आणि प्रवाशांना सातत्याने आवाहन करण्यात येते की, रेल्वे रुळांवर बेकायदेशीरपणे उतरणे किंवा स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणारे कोणतेही कृत्य करणे हा अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. अशा सूचना असूनही त्याकडे प्रवासी व नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
