वसई: वसई-विरार महानगरपालिका परिवहन सेवेच्या एका बस चालकाची रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यासोबत जोरदार वाद झाल्याची घटना घडली आहे. बस जाण्यास अडथळे निर्माण झाल्याने हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घडलेला वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यामुळे नालासोपाऱ्यातील फेरीवाल्यांचा प्रश्न आणि वाहतूक कोंडीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

​नालासोपारा पूर्व भागातील आचोळा आणि तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी असते. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते अधिकच लहान होतात. अशाच एका अरुंद कोंडीतून मार्ग काढताना परिवहन सेवेचा बस कर्मचारी आणि आणि एका फेरीवाल्याचा वाद झाला.

​फेरीवाल्यांनी रस्त्यात निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे संतप्त झालेल्या बस चालकाचा संयम सुटला आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बस चालक आणि फेरीवाला एकमेकांशी भिडल्याचे स्पष्ट दिसत आहे. या गोंधळामुळे काही काळ परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

​या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नालासोपारा पूर्व स्टेशन परिसर, आचोळा रस्ता आणि तुळींज परिसरात सायंकाळच्या वेळी पादचाऱ्यांना चालणेही कठीण होऊन बसते. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच असे प्रसंग घडत आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया नागरीकांमधून उमटत आहेत