वसई :- नालासोपारा पश्चिम भागातील ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने वसई-विरार महापालिकेने पावले उचलली आहेत. रविवारी महापौर अजीव पाटील यांनी परिसरातील महत्त्वाच्या स्थळांचा विशेष पाहणी दौरा करून त्यांच्या दुरूस्तीसह सुशोभीकरणाचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, गौतम बुद्ध स्मारक आणि सामाजिक समतेचे प्रतीक असलेली पंचशील कमान या ऐतिहासिक स्थळांचा यामध्ये समावेश आहे.
दौऱ्याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. या परिसरातील स्वच्छता, अत्याधुनिक प्रकाशयोजना आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली समानता व न्यायाची तत्त्वे आजही दिशादर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मारकांची योग्य देखभाल करणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी असल्याचे महापौर अजीव पाटील यांनी स्पष्ट केले.
याशिवाय गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची पाहणी केली. शांतता आणि अहिंसेचा संदेश देणारा हा परिसर स्वच्छ व प्रेक्षणीय ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे तसे आदेश त्यांनी स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. येथील पर्यटनाचे महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्नशील आहे असेही त्यांनी दौऱ्या दरम्यान सांगितले.
माजी महापौर रूपेश जाधव, माजी नगरसेवक जाधव, स्थानिक नगरसेवक परेश किणी, नगरसेविका ॲड. दीप्ती भोईर, माजी नगरसेवक नरेश जाधव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचशील कमानीचे सुशोभीकरण
सामाजिक एकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘पंचशील कमानी’च्या दुरवस्थेकडेही महापौरांनी लक्ष वेधले. कमानीच्या संरचनेची पाहणी करून तिच्या तातडीच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. या कमानीभोवती विद्युत रोषणाई, सुशोभीकरण आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात यावे अशा सूचना ही त्यांनी केल्या आहेत.
