वसई: इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील दिशा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर आता इराणकडून दुबई सह विविध देशांवर हल्ले केले जात आहेत. याचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर झाला असून त्यामुळे पर्यटनासाठी गेलेला नालासोपाऱ्यातील एक तरुण रशियात अडकून पडला आहे. रशियात व्हिसा आणि मास्टरकार्डवर आलेले निर्बंध आणि विमान कंपनी आणि ट्रॅव्हल एजन्सीकडून मिळालेल्या असहकार्यामुळे त्याने समाजमाध्यमांवर आपली व्यथा मांडली आहे.
इराण, इस्रायल आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता मध्यपूर्वेतील देशांवर दिसून येत आहे. दुबईसह संयुक्त अरब अमिरात देशात इराणकडून हल्ले केले जात आहेत. त्यामुळे या देशातून जाणाऱ्या विमानसेवांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे अनेक भारतीय नागरिक परदेशी देशांमध्ये अडकून पडले आहेत. तर रशियात गेलेला एक तरुण मॉस्को विमानतळावर अडकून पडला आहे.
काही दिवसांपूर्वी रशियात तो फिरण्यासाठी गेला होता. तर काल तो भारतात यायला निघाला होता. पण, अचानक विमान रद्द झाल्यामुळे तो मॉस्को विमानतळावर अडकला आहे. रशियात सध्या आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहारांवर निर्बंध असल्याने त्याचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड चालत नाहीत. हातात असलेली सर्व रोख रक्कम संपल्याने पिण्याच्या पाण्यासाठीही त्याला संघर्ष करावा लागत आहे.
विमानतळावरील विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली असता, त्यांनी मदत करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे पीडित तरुणाने सांगितले आहे. “विमानतळावरील कर्मचारी माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत. विचारणा केली असता केवळ कस्टमर केअरला फोन करा, असे सांगून ते निघून जात आहेत. तासनतास फोन करूनही कस्टमर केअरकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये,” अशी हतबलता त्याने व्यक्त केली आहे
विमानतळ प्रशासनाकडून आणि संबंधित कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या तरुणाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवरून भारत सरकार, रशियातील भारतीय दूतावास आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे मदतीची मागणी केली आहे. “माझे कुटुंब घरी वाट पाहत आहे, पण मी सुरक्षित घरी पोहोचू शकेन की नाही, याची मला भीती वाटत आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तर परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी भारतीय दूतावास नेहमीच तत्पर असते. या प्रकरणातही नालासोपाऱ्यातील या तरुणाला सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून केली जात आहे.
