वसई: नालासोपारा पश्चिमेतील वृंदावन गार्डन फन फिस्ट परिसरात महापालिकेचे उद्यान आहे. मात्र, या उद्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्यामुळे उद्यानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तुटलेली खेळणी आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे नागरिकांना या उद्यानात वावरणे कठीण होऊन बसले आहे.
वसई विरार महापालिकेकडून नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी यासाठी विविध ठिकाणी उद्याने तयार करण्यात आली आहेत. तसेच काही वर्षांपूर्वी या उद्यानांमध्ये कारंजी, नवीन खेळणी तसेच बाक बसवून त्यांचे सुशोभीकरण देखील करण्यात आले होते. या उद्यानांची नीट देखरेख व्हावी या उद्देशाने काही महिला बचत गटांची निवड करून त्यांना या उद्याच्या स्वच्छतेची आणि देखभालीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, गेल्या काही काळात या उद्यानांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उद्यानातील सामानाची दुरावस्था झाली आहे.
नालासोपारा पश्चिमेला वृंदावन गार्डन फन फिस्ट परिसर आहे. या परिसरात महापालिकेचे उद्यान आहे. या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, बसण्यासाठी बाकडे, तसेच व्यायामाची साधने बसवण्यात आली आहेत. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. उद्यानात मुलांसाठी लावलेले झोपाळे, पूर्णपणे तुटलेले असून अनेक ठिकाणी खेळण्याची साधने विखुरलेल्या अवस्थेत पडलेली आहेत. तसेच ही खेळणी गंजली असल्यामुळे
मुलांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
याबाबत बोलताना भाजपचे ब्रह्मदेव सिंह राजन यांनी उद्यानावर खर्च केलेला कोट्यवधींचा निधी फक्त कागदावरच मर्यादित राहिला असल्याचा आरोप केला आहे. तसेच निष्काळजीपणा करणारे अभियंते आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
