वसई:- नालासोपारा येथील आचोळे रोड परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीमध्ये काम करत असताना, आठव्या मजल्यावरून खाली पडल्याने एका २८ वर्षीय महिला मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
कविता साहू (२८) असे मयत महिलेचे नाव असून ती नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील ‘श्वेतगंगा कन्स्ट्रक्शन’ या इमारतीच्या बांधकाम ठिकाणी आपले वडील आणि पती मिथुन साहू यांच्यासोबत मजुरीचे काम करत होती. दुपारी एक वाजेच्या सुमारास कविता आठव्या मजल्यावरील गॅलरीमध्ये बांधकामासाठी लागणारे सिमेंट ब्लॉक देण्याचे काम करत असताना, अचानक तिचा तोल गेला आणि ती गॅलरीतून थेट खाली पडली.
गंभीर जखमी झालेल्या कविताला तात्काळ विजयनगर येथील महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात शेकडो गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यांची कामे ही वेगाने सुरू आहेत.असे जरी असले तरीही अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षा नियमांना तिलांजली दिली जात आहे.यामुळेच शहरात विविध दुर्घटनेत मजूर कामगारांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे मजूरांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित बांधकाम व्यावसायिक व ठेकेदार उपाययोजना केल्या आहेत का याची सुद्धा पाहणी करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
