भाईंदर :- मिरा-भाईंदर शहराला ‘जैन नगरी’ तसेच ‘मिनी राजस्थान’ असा उल्लेख केल्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी गुरुवारी स्पष्टीकरण देत माफी मागितली. आपण सर्व समाजांचा आदर करतो. जैन समाजाचा अभिमान असल्याने कार्यक्रमात त्या संदर्भात विधान केले होते. मात्र, त्यातून इतर कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे कोणाचे मन दुखावले असल्यास माफी मागतो, असे मेहता यांनी स्पष्ट केले.
मिरा-भाईंदर शहराला ‘जैन नगरी’ तसेच ‘मिनी राजस्थान’ म्हणून ओळखले जाते, असे विधान मेहता यांनी जैन समाजाच्या एका कार्यक्रमात केले होते. शहरात ३३ पेक्षा अधिक जैन मंदिरे असल्याचा उल्लेख करत त्यांनी जैन समाजाचा शहराशी असलेला संबंध अधोरेखित केला होता. तसेच आपण जैन समाजात जन्मलो असून, समाजाच्या प्रश्नांसाठी ताकदीने उभे राहतो, असेही त्यांनी सांगितले होते. या विधानावरून शहराच्या ओळखीबाबत चर्चा सुरू झाली.पर्युषण पर्वाच्या काळात आपण चालवत असलेल्या शाळेत कंदमुळे आणण्यावर बंदी घातली होती. या निर्णयावर वाद झाला, मात्र आपण निर्णयापासून मागे हटलो नाही, असेही मेहता यांनी कार्यक्रमात सांगितले होते.
तसेच जैन साधूंच्या पायांना उन्हाचे चटके बसू नयेत, यासाठी रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या लावण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.या विधानानंतर मिरा-भाईंदर शहराची ओळख एका समाजापुरती मर्यादित करण्यावरून आक्षेप घेण्यात आले. शहरात विविध समाजांचे नागरिक राहत असताना ‘जैन नगरी’ किंवा ‘मिनी राजस्थान’ असा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर मेहता यांनी माध्यमांसमोर येत आपल्या विधानाचा खुलासा केला. आपण सुरुवातीपासून सर्व धर्मांचा आणि समाजांचा आदर करतो. जैन समाजाचा अभिमान असल्याने कार्यक्रमात त्या संदर्भात विधान केले होते. त्याचा अर्थ इतर समाजाचा अपमान करणे असा नव्हता. त्यामुळे आपल्या वक्तव्यामुळे कोणाचे मन दुखावले असल्यास आपण माफी मागत असल्याचे त्यांनी सांगितले.
