भाईंदर : मिरा-भाईंदरमधील रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या कर्जप्रस्तावाला नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळत नसल्याचा आरोप करत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.येत्या ११ ऑगस्ट रोजी ठाणे-घोडबंदर मार्गावरील फाउंटन हॉटेलजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.या घोषणेमुळे महायुतीतील भाजप-शिवसेना युती मधील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले आहे.
मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. ठाणे-घोडबंदर मार्गाच्या दुरुस्तीच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हा रस्ता राज्य शासनाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला असून त्याच्या दुरुस्तीबाबतही वाद निर्माण झाला आहे.दरम्यान शहरातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी महापालिकेने खासगी बँकेकडून कर्ज उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
या कर्जासाठी शासनाची प्राथमिक मंजुरी मिळाल्यानंतर बँकेकडून कर्ज वितरणास अंतिम मंजुरी देणारा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या प्रस्तावावर कोणताही निर्णय होत नसल्याचा आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला. यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची चार वेळा भेट घेऊनही प्रतिसाद मिळत असून यास दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे आरोप मेहता यांनी केले आहेत.तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शहरातील प्रश्न सोडविण्याऐवजी राजकारण करत असल्याचा आरोपही मेहता यांनी केला आहे.परिणामी शहराच्या विकासकामांमध्ये विलंब होत असल्याने नगरविकास विभागाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
ठाणे-घोडबंदर मार्गाची जबाबदारी महापालिकेला जड
ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख ते फाउंटन हॉटेलदरम्यानचा सुमारे साडेचार किलोमीटरचा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला असला, तरी एवढ्या मोठ्या वाहतुकीचा रस्ता सांभाळणे महापालिकेला आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचा दावा नरेंद्र मेहता यांनी केला आहे. शहरातील केवळ तीन टक्के वाहतूक या मार्गांवरून होते.तरी देखील रस्ते दुरुस्तीच्या निधीपैकी जवळपास २० टक्के निधी याच मार्गावर खर्च होतो. त्यामुळे हा रस्ता पुन्हा राज्य शासनाच्या अखत्यारीत देण्याबाबत महापालिकेने भाजप सत्तेत येताच केला आहे. मात्र अदयापही यास नगर विकास मंत्र्यांनी मंजुरी दिलेली नाही.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार :-
मिरा भाईंदर मधील अनेक विकास कामे ही शिवसेनेकडे असलेल्या नगर विकास खात्यामुळे रखडली जात आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली असल्याचा दावा देखील मेहता यांनी केला आहे.
शिंदे शहरात असतानाच आरोप :-
सत्तेत शिवसेनेकडे असलेल्या नगर विकास खात्याबाबत भाजप आमदार नरेंद्र मेहता नाराजी व्यक्त करत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिरा भाईंदरच्या उत्तन येथील रामभाऊ माळगी प्रबोधनीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेचे कार्यक्रमाला उपस्थित होते.
